पुणे : टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरुर उपविभागीय कार्यालायातील लिपिक महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.याप्रकरणी शिरुर उपविभागीय कार्यालयातील लिपिक सुजाता मनोहर बडदे, तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदारांची जमीन टेमघर प्रकल्पासाठी राज्य शासनाने संपादित केली होती. शासनाकडून त्यांना शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडीत जागा देण्यात येणार होती. शेतजमीन आणि घरासाठी दोन गुंठ्यांचा भूखंड शासनाकडून त्यांना मंजूर झाला होता. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे प्रस्ताव शिरुर उपविभागीय कार्यालायातील लिपिक सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते.शिरुर उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर संंबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी प्रत्येक प्रस्तावापोटी ५० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. बडदे यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून चार लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीत प्रत्येक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितली होती.
आठ प्रस्ताव मंजूरीसाठी तीन लाख २० हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. लाचेच्या पहिला हप्त्यापोटी एक लाख ६० हजार रुपयांची लाच घेऊन तक्रारदाराला शिरुर उपविभागीय कार्यालायात बोलाविण्यात आले. बडदे यांच्या सांगण्यावरुन ही रक्कम खासगी व्यक्ती तानाजी मारणे याच्याकडे दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मारणेला लाच स्विकारताना पकडले. चौकशीत बडदे यांच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे उघड झाल्यानंतर दोघांविरुद्ध रात्री उशीरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करत आहेत.