बारामती : बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी एक लाख ७५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहात पकडले. काल संध्याकाळी हा अधिकारी बारामती मधील एका व्यायाम शाळेत एक लाख रुपये स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागामध्ये प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगर रचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे याने एक लाख ७५ हजार रुपयाची लाच मागितली होती, या अधिकाराच्या सततच्या त्रासामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहानिशा केली, तडजोडी अंती या अधिकाऱ्याने एक लाख रुपये घेऊन सही करण्याचे तयारी दर्शवली होती, त्यानुसार काल सायंकाळी सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका व्यायाम शाळेत मध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले, या अधिकाऱ्यावर यापूर्वीही लाच प्रकरणी कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे,काल सायंकाळी झालेल्या कारवाईनंतर बारामती नगर परिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे.
गेल्या काही दिवसात विकास ढेकळे यांच्या पैशाच्या हव्याशाचे अनेक किस्से चर्चेत आले होते, कोणतेही काम करायचे झाल्यास हा अधिकारी पैसे शिवाय करत नव्हता, त्यामुळे बारामतीतील व्यावसायिकांसह सामान्य नागरिक सुद्धा वैतागले होते, काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर या अधिकाराच्या जाचातून सर्वसामान्यांसह बांधकाम व्यवसायिकांची मुक्तता झाली, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त केली जात आहे,दरम्यान,या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे.