पिंपरी- चिंचवडमध्ये चार लाखाची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे. सुरेंद्र साहेबराव जाधव अस रंगे हात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ही कारवाई आज मंगळवारी चिंचवड येथे करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी, ५३ वर्षीय तक्रारदार यांचा पिंपरी- चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठ्यांत बंगला आहे. बंगल्याचा सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाखांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रादार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.
तडजोडअंती साडेचार लाख लाच मागीतल्याच निष्पन्न झाले. चिंचवड येथील मंडल अधिकारी कार्यालयाच्या पार्किंग मध्ये सापळा रचण्यात आला. पंचाच्या समोर लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी चार लाख रुपये स्वीकारले. ही रक्कम चारचाकीमध्ये ठेवत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात पकडले. सुरेंद्र जाधव यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम सन- १९८८ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.