पुणे : गुन्ह्यात जप्त असलेली मोटार परत ताब्यात मिळण्यासाठी लष्कर न्यायालयात दाखल अर्जावर ‘म्हणणे’ (से) मांडण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लष्कर न्यायालयातील सहायक सरकारी वकील महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी सहायक सरकारी वकील अंजला नवगिरे (वय ५४) यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने (वय ३६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मोटार जप्त करण्यात आली होती. मोटार परत ताब्यात मिळण्यासाठी तक्रारदारांनी वकिलामार्फत लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने या अर्जावर सरकारी वकील अंजला नवगिरे यांना म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

हेही वाचा…बाळाच्या बौद्धिक विकासासाठी रुग्णालयात आता ‘बेबीज विथ बुक्स’! जाणून घ्या या अनोख्या प्रयोगाविषयी…

तक्रारदार महिलेने सरकारी वकील नवगिरे यांची भेट घेतली. त्यावेळी नवगिरे यांनी तक्रार अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नवगिरे यांना पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti corruption bureau nabs assistant public prosecutor for accepting rs 10000 bribe in pune pune print news rbk 25 psg