पुणे : दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाला दोन हजार रुपयांची लाच देणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. आरोपीविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनअली गुलाब बारटक्के (वय ४५, रा. ताडीवाला रोड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबात सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती.

एलसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हसनअली याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम करत आहेत. हसनअली हा कदम यांना वारंवार गुन्ह्यात मदत करण्यासाठी म्हणून लाच देण्याचा प्रयत्न करत होता. कदम यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. यानंतर गुरूवारी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात हसनअली याला पोलीस अधिकारी कदम यांना लाच देत असताना एसीबीने त्याला पकडले.

Story img Loader