बेकायदा सावकारी करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एका सराफाला खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदाराने साडेतीन लाख रुपयांची मूळ रक्कम व्याजासह परत केल्यानंतर सराफाने सात लाख रुपयांची मागणी केली होती.
या प्रकरणी सराफ व्यावसायिक प्रशांत सुरेश तोलगेकर (रा. विठ्ठल रुक्मिणी सोसायटी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रारदाराला कौटुंबिक कारणासाठी पैशांची गरज होती. तक्रारदाराने सऱाफ प्रशांत तोलगेकरशी संपर्क साधला. तोलगेकरने तक्रारदाराला पेढीवर बोलावून साडेतीन लाख रुपये व्याजाने दिले. तक्रारदाराची मोटार तसेच सदनिकेची कागदपत्रे तोलगेकरने गहाण ठेवली.
त्यानंतर तक्रारदाराने तोलगेकरला मूळ मुद्दल तसेच व्याजापोटी साडेतीन लाख रुपये दिले. पैसे परत केल्यानंतर सराफाने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने गुन्हे शाखेकडे अर्ज दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर आदींनी कारवाई करुन तोलगेकरला ताब्यात घेतले. महाराष्ट्र सावकारी अधिनयमान्वये तोलगेकरच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.