पिंपरी- चिंचवडच्या आकुर्डी भागात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. रात्री च्या सुमारास रस्त्याने येऊन- जाऊन करणाऱ्या नागरिकांना बेंद्या सोनी नावाचा गुंड त्रास देत होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळताच त्याला चांगलाच चोप देऊन बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, आकुर्डी भागातील उर्दू शाळेसमोर सराईत गुंड बेंद्या हा शर्ट काढून मद्यपानाच्या नशेत रस्त्याने येऊन- जाऊन करणाऱ्या नागरिकांना त्रास देत होता. रात्रीची वेळ असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. काही तरुणांना त्याने मारहाण केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन गुंड बेंद्याला चोप देत बेड्या ठोकल्या आहेत. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दहशत पसरविण्यासाठी तो अशा पद्धतीने नागरिकांना घाबरवत असायचा आणि मारहाण करायचा. अखेर त्याला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.