पिंपरी- चिंचवड : मालमत्ता विरोधी पथकाने दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई कासारवाडी पुलाखाली करण्यात आली. अजर रमजान सय्यद विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सुचने नुसार वेगवेगळ्या भागात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कारवाई केली जात आहे. मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत पिस्तुल बाळगणाऱ्या अजर सय्यद ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कासारवाडी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या पुलाखाली आरोपी अजर रमजान सय्यद पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कोकणे, रासकर आणि कदम यांना मिळाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी खांडे, लोखंडे, बनकर, कदम, सावंत यांनी सापळा रचला आणि आरोपी अजर रमजान सय्यद ला दोन पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसासह बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ने यापूर्वी देखील पिस्तुल विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे. पिस्तुल आणि जिवंत काडतुसे हे मध्य प्रदेशातून आल्याचा संशय ही पोलिसांना आहे. आरोपी हा कुणाला पिस्तुल विक्री करण्यासाठी आला होता. याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मालमत्ता विरोधी पथक करत आहे.