पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी याबाबतचे आदेश दिले.
हेही वाचा >>> कात्रज भागात दहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकजण अटकेत
कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्या निषेधार्थ सिंधूदुर्गात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने जाधव यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण केल्याची फिर्याद डेक्कन पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >>> पुणे: एसटी स्थानकांच्या आवारात दलालांची ‘घुसखोरी’; चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भास्कर जाधव यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जाधव यांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. संदीप जाधव यांनी बाजू मांडली. जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका केली आहे. कोणताही समाज, जात, धर्माच्या विरोधात त्यांनी आक्षेपार्ह विधान किंवा टीका केलेली नाही. जाधव यांच्या विरोधात खोटी कलमे लावण्यात आली. राजकीय दबाबातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असा युक्तीवाद ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.