मी ४० वर्षांपूर्वी पुण्यातील एफटीआयआय या संस्थेत विद्यार्थी म्हणून आलो होतो. तेव्हाचे दिवस विसरू शकत नाही. या संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे ही आनंदाची बाब आहे या संस्थेत आजही एक विद्यार्थी म्हणूनच आल्याची भावना माझ्या मनात आहे असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे. सोमवारी त्यांनी या संस्थेत हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एफटीआयआयमध्ये झालेल्या मागील काही घटना लक्षात घेता वातावरण चांगले कसे राहिल याची विशेष काळजी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची मागील आठवड्यात अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नेमक्या त्यांच्या निवडीच्याच दिवशी ५ विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आले तर ४७ जणांना नोटीसा धाडल्या गेल्या. त्यामुळे काहीसे नाराजीचे वातावरण होते. मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कुठलीही कल्पना न देता अनुपम खेर त्यांच्या कारने एफटीआयआयमध्ये आले. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने गाडीतील चालकास नाव विचारले आणि ओळख पत्र मागितले. तेवढ्यात मागच्या बाजूला बसलेले अनुपम खेर हे लगेच खाली उतरून प्रवेशद्वारून संस्थेत प्रवेश केला. अनुपम खेर आल्याचे पाहताच विद्यार्थी तिकडे आले.

अनुपम खेर हे सगळ्यांना आनंदाने भेटले. संस्थेतील एका झाडाखाली लावण्यात आलेला आंदोलनाचा कापडी फलक त्यांनी त्यांच्या हाताने काढला. त्यानंतर अनुपम खेर कँटीनमध्ये गेले, विद्यार्थ्यांसोबत त्यांनी जेवणही केले. त्यांच्या साधेपणाने सगळा विद्यार्थी वर्ग भारावून गेला होता. त्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड दिसून आली.

Story img Loader