पुणे : गर्भधारणा काळातील तसेच गरोदरपणातील चिंता ही मुदतपूर्व प्रसूतीला कारणीभूत ठरू शकते असा धोक्याचा इशारा जगभरातील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर चारपैकी एका गरोदर महिलेमध्ये गर्भधारणा काळात; तसेच गरोदरपणात चिंता आणि भीतीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. अशा महिलांची प्रसूती नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच होण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा >>> तणावपूर्ण जीवनशैलीही विस्मरणाला कारणीभूत!
हेल्थ सायकॉलॉजी या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. गर्भधारणा आणि गरोदरपणाची चिंता करणाऱ्या महिलांच्या तुलनेत चिंता न करणाऱ्या महिलांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता तुलनेने कमी असल्याचे या शोधनिबंधातून स्पष्ट करण्यात आले आहे. मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांना दीर्घकाळ वैद्यकीय उपचारांची; तसेच अतिरिक्त काळजीची गरज जाणवते, हेही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले आहे. नवीन मातांमध्ये प्रसूतीनंतरचे नैराश्य हे गेल्या काही वर्षांत सर्वसाधारण आणि नित्याची गोष्ट झाली आहे. मात्र, गर्भवती महिलांमधील चिंता ही एक नवीन मनोसामाजिक अवस्था बऱ्याच प्रमाणात दिसून येत आहे. हेल्थ सायकॉलॉजी या नियतकालिकाने सुमारे १९६ महिलांच्या गरोदरपणादरम्यान केलेल्या अभ्यासावरून याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत.
हेही वाचा >>> लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नानंतर वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास काय करावं?
गरोदरपणाच्या काळात बदलती जीवनशैली, जगण्याचा वेग, वाढती स्पर्धा आणि ताणतणाव यांच्याशी दोन हात करताना नवजात बाळाची काळजी घेण्याबाबतच्या चिंतेने महिलांना ग्रासल्याचे दिसून आले आहे. अशी चिंता टाळण्यासाठी गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी होणाऱ्या आईची चिंता आणि भीती याबाबत काळजी घ्यावी, ज्या महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण अधिक आहे, त्यांच्यामध्ये प्रसूती पूर्ण होईपर्यंत समुपदेशनासारख्या उपायांचा अवलंब करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
काळजी घ्या..
मदरहूड रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. पायल नारंग म्हणाल्या, पहिल्या गर्भधारणेदरम्यान नकारात्मक विचार किंवा चिंता ही भावना तीव्र असते. ज्या महिला आधीच नैराश्य किंवा चिंतेचा सामना करत असतात, त्यांच्यासाठी हा काळ अधिक कठीण ठरू शकतो. आपल्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी अधिकाधिक काळजी घ्यावी, मात्र चिंता करणे हिताचे नाही, हे महिलांच्या मनावर ठसवावे लागते. संतुलित आहार, चालण्याचा व्यायाम, पुरेशी विश्रांती घ्या आणि गर्भधारणेदरम्यान जीवनसत्त्वांचे सेवन या गोष्टी उपयुक्त ठरतात. तणाव, चिंता, नैराश्य येत असल्यास कुटुंबातील व्यक्तींशी मनमोकळा संवाद, मन गुंतवणाऱ्या कला किंवा छंद जोपासणे यांचाही सकारात्मक परिणाम शक्य आहे, असेही डॉ. नारंग यांनी स्पष्ट केले.