पुणे : ओपन हॉर्ट सर्जरी न करता एका व्यक्तीच्या महाधमनीतील झडप डॉक्टरांनी बदलली. अत्याधुनिक ‘ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन’ (टावी) या प्रक्रियेद्वारे हे उपचार करण्यात आले. ही प्रक्रिया ८३ वर्षाच्या व सहव्याधी असलेल्या रुग्णावर यशस्वीपणे करण्यात आली.
हा रुग्ण चार महिन्यांपासून दम लागणे आणि पायावर सूज येणे अशा हृदयविकाराच्या लक्षणांनी सहा महिन्यांपासून त्रस्त होता. त्याच्या महाधमनीची झडप बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. विविध चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला झडप बदलविण्याचे सूचविले. रुग्णाचे वय जास्त असल्याने ‘ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतीही चिरफाड न करता, हृदयावर शस्त्रक्रिया न करता झडप बदलण्याची प्रक्रिया करण्यात आली. रुग्णाला दोन दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
डॉ. अनमोल सोनावणे यांनी टावी आणि व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही प्रक्रिया भारतात करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी भारतासह ३६ देशांमध्ये दीड हजारहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही प्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायद्याची ठरत आहे. डॉ. सोनावणे यांनी आता डीपीयूसोबत व्हॉल्व्ह क्लिनिकला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – अकरावी प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद; यंदा किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
अशी होते टावी प्रक्रिया…
याबाबत डॉ. अनमोल सोनावणे म्हणाले की, रुग्णाचे वय आणि सहव्याधी लक्षात घेता ओपन हार्ट सर्जरी करणे शक्य नव्हते. अशा वेळी ‘ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन’ एक प्रभावी उपचारपद्धती आहे. यामध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीप्रमाणे हातातून एक कॅथेटर रक्तवाहिनीद्वारे हृदयापर्यंत नेण्यात येतो. पेसमेकरद्वारे हृदयाची स्पंदने २५० बीट प्रतिमिनिटपर्यंत वाढविण्यात येतात. हृदय स्थिर झाले की, कृत्रिम कॅथेटरद्वारे नेण्यात आलेली झडप हृदयात उघडण्यात येते. कालांतराने ती स्थिर झाली की, कॅथेटर काढून घेतला जातो.