पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फक्त देशातून नव्हे तर थेट शत्रूच्या घरात घुसून स्वातंत्र्याची लढाई लढली. इंग्लडमधील ज्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये वास्तव्य करून सावरकरांनी या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच इंडिया हाऊसच्या बाहेर आज तेथील ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या गौरवार्थ फलक लावला आहे. म्हणजे ज्या इंग्रज सरकारविरोधात लढण्यात सावरकरांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या शत्रूने त्यांचा गौरव केला. मात्र दुसरीकडे ज्या देशवासीयांसाठी त्यांनी हा लढा लढला त्याच देशवासीयांकडून आज त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही, असे प्रतिपादन व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी यांनी केले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी (दि. १७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर अपर्णा कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज हे उपस्थित होते.
हे ही वाचा… पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
आपल्या व्याख्यानात अपर्णा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील झंझावाती कार्याचे साक्षीदार असलेल्या आठ महत्वपूर्ण स्थानांची महिती आणि माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे श्री गणरायाची आठ महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र अष्टविनायक म्हणून ओळखली जातात. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनात या आठ ठिकाणांना अष्टविनायकाएवढेच महत्व आहेत. ज्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्याला देशप्रेमाची प्रेरणा मिळते.
या ठिकाणांमध्ये पहिले सावरकरांचे नाशिक येथील जन्मस्थान, दुसरे नाशिक येथील भगूर या ठिकाणी असलेल्या अष्टभुजा देवीचे मंदिर ज्याठिकाणी त्यांनी “मारता मारता मरेतो झुंजेन” ही स्वातंत्र्यलढ्याची सशस्त्र क्रांतीची पहिली प्रतिज्ञा घेतली, तिसरे ठिकाण नाशिकमधील तीळभांडेश्वराच्या गल्लीतील भाड्याचे घर ज्याठिकाणी त्यांनी मित्र मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे बीज रोवण्याचे काम केले. पुढील चौथे ठिकाण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथील जेन्ट्स ब्लॉकमधील खोली क्रमांक १७. याठिकाणी त्यांनी समवयस्क आणि समविचारी मित्रांना एकत्रित करून त्यांनी अभिनव भारत संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पाचवे ठिकाण ते थेट लंडनमधील इंडिया हाऊस ही वास्तू, याठिकानाहूनच सावरकर यांनी भारतातील क्रांतीकारकांना अत्याधुनिक शस्त्र पुरविण्याचे क्रांतिकारी कार्य केले.
हे ही वाचा… पुण्यात परवडणारी घरे का मिळत नाहीत? नेमकी कारणे आली समोर…
पुढे सहावे ठिकाण म्हणजे मार्सेलिनचा किनारा, ज्यावेळी सावरकरांना व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक करून खटला चालविण्यासाठी त्यांना ‘मोरया’ बोटीमधून भारतात आणण्यात येत असते. यावेळी बोटीच्या पोर्ट होलद्वारे ते समुद्रात उडी मारतात. मात्र मार्सेलीनच्या किनाऱ्यावर त्यांना पुन्हा पकडण्यात येते. त्यांच्या अष्टविनायकातील सातवे ठिकाण म्हणजे अंदमानचे तुरुंग ज्याठिकाणी त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. तर शेवटचे आठवे ठिकाण म्हणजे रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत राहिलेले ठिकाण, ज्याठिकाणी त्यांनी हिंदू धर्मातील स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भेदाभेदीच्या भिंती तोडण्यासाठी जीवाचे रान केले. याठिकानीच त्यांनी पतित पावन मंदिर बांधले. व आयुष्याच्या शेवटी मुंबईतील दादर येथील सावरकर सदन याठिकाणी आपला देह ठेवला. प्रत्येक भारतवासीयांनी आयुष्यात किमान एकदा तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या आठ प्रेरणास्थळांना भेट द्यावी. परदेशातील शक्य नसले तरी किमान महाराष्ट्रातील स्थळांना भेट देऊन स्वातंत्र्यवीरांच्या देशप्रेमाची प्रेरणा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे अशा भावना, कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.