पुणे : बांगलादेशातील राजकीय अस्थिरेतेमुळे बांगलादेशातून होणारी कापड आणि सूताची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जागतिक ग्राहकांकडून भारताकडे मागणी वाढू लागली आहे. कापड आणि सूताच्या दरात किंचित दरवाढ झाली असून, पुढील दीड – दोन वर्ष उद्योगात तेजी राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात कापूस उत्पादन किंवा कापड उद्योग खूप मोठा नाही. पण, बांगलादेश चीनकडून कापड, सूत घेऊन बांगलादेशी कापड किंवा सूत म्हणून त्याची जागतिक बाजारात विक्री करतो. चीनचे युरोप, अमेरिकेसह जगातील अनेक देशांशी सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे चीन जगातील अनेक देशांना थेट कापड, सूताची निर्यात करीत नाही. याचा फायदा बांगलादेशी व्यापारी उठवितात. चीनकडून स्वस्तात घेतलेले कापड, सूताची बांगलादेश निर्यात करतो. सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे. पुढील दीड – दोन वर्ष ही अस्थिरता राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग पुढील दोन वर्ष तेजीत राहण्याचा अंदाज आहे. बांगलादेशाकडून होणारी निर्यात ठप्प झाल्यामुळे जगातील ग्राहकांकडून भारताकडे मागणी वाढली आहे. मागील काही दिवसांत जगातील व्यापाऱ्यांकडून भारतीय व्यापाऱ्यांकडे विचारणा होऊ लागली आहे. काही व्यापाऱ्यांनी अगाऊ नोंदणीही केली आहे.
हेही वाचा >>> राज्यात पावसाचा पुन्हा जोर ? जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील घडामोडी
गुजरातमधील अतिवृष्टीचा मोठा फटका
गुजरातमध्ये मागील पाच – सहा दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील एकूण कापूस उत्पादनाच्या सुमारे ६० टक्के फक्त सौराष्ट्रमध्ये उत्पादीत होतो. अतिवृष्टीत सौराष्ट्रमधील कापूस मातीमोल झाला आहे. सततचा पाऊस आणि पिके पाण्यात बुडाली असल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये प्रामुख्याने शंकर – ६ वाणाच्या कापसाची लागवड होते. हा कापूस तलम, उच्च दर्जाचे कापड तयार करण्यासाठी वापरला जातो. नेमक्या याच कापसाची लागवड अतिवृष्टीमुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे पुढील वर्षभर दर्जेदार कापसाचा तुटवडा राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> पुण्यात ऑगस्टमध्ये पडला उच्चांकी पाऊस; जाणून घ्या, सरासरी पाऊस किती पडतो
निर्यात पूरक धोरणांची गरज
बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारतीय वस्त्रोद्योगात तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. कापड, सूताच्या दरात वाढीचा कल दिसून येत आहे. आता केंद्र सरकारने या स्थितीचा फायदा उठविण्यासाठी निर्यात धोरण उद्योग पूरक करण्याची गरज आहे. निर्यात वाढली तर देशी कापड उद्योगाला ऊर्जितावस्था येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.