ज्येष्ठ चित्रकर्मी दादासाहेब तोरणे यांचा ‘पुंडलिक’ हा सिनेमा  १८ मे १९१२ रोजी प्रदर्शित झाला होता, त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे जनक दादासाहेब फाळके नव्हे तर दादासाहेब तोरणेच असून त्यांना न्याय मिळावा यासाठी १२ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
चित्रपट निर्माते व ‘इम्पा’ चे संचालक विकास पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दादासाहेब यांचे चिरंजीव विजय तोरणे, अनिल तोरणे, सून मंगला तोरणे आणि लेखक शशिकांत किणीकर उपस्थित होते. फाळके यांचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ १९१३ साली प्रदर्शित झाला. मात्र, तोरणेंचा चित्रपट १९१२ सालीच प्रदर्शित झाल्याचे इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे सिद्ध झाले आहे. तोरणेंचा पहिल्या चित्रपटानंतर दहा वर्षांनी दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. या कालावधीत फाळकेंचे ५-६ चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्यांनाच चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाऊ लागले. मात्र तोरणेंनी त्याआधी पूर्ण लांबीचा चित्रपट बनविला असल्याचे पाटील यांनी सांगितले. मंगला तोरणे म्हणाल्या, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक फाळके की तोरणे हा वाद नाही पण तोरणेंच्या चित्रपटसृष्टीताल योगदानाची दखल घेतली जावी आणि फाळकेंना चित्रपटसृष्टीचे पितामह म्हटले जात असेल तर तोरणेंना चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जावे अशी मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा