चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एनडीए-मुळशी रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुना पूल पाडून तेथे नवा पूल उभारण्यात येणार असून जुना पूल १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाडला जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सेवा वाहिन्यां स्वखर्चाने काढाव्यात, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – अर्थकारण व्यवस्थित राहीलं नाही तर कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो – शरद पवार

चांदणी चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याचा शुक्रवारी सायंकाळी फटका बसला होता. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजना सुरू झाल्या असून त्याअंतर्गत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारा जुना उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने मुंबई-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) एन.डी.ए.- मुळशी उड्डाणपूल या अंतर्गत पाडला जाणार आहे. याच ठिकाणी नव्याने उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे उड्डाणपूलाखाली असलेल्या पाणीपुरवठा, दूरध्वनी, विद्युती वाहिनी, ओएफशी केबल्स आदी सेवा वाहिन्या संबंधितांना स्वखर्चाने स्थलांतरीत कराव्या लागणार आहेत. सेवा वाहिन्या संस्थलांतरासाठी दहा सप्टेंबरपर्यंतची मुदत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

पुणे शहरातील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथील चांदणी चौक येथील उड्डाणपूल आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे प्रगतीपथावर आहे. उड्डाणपूल तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

Story img Loader