पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बारावीसाठी १० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर, दहावीसाठी १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
हेही वाचा >>>Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना खासगीरित्या परीक्षा देण्याची संधी दिला जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर, दहावीच्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे १५ सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक असल्याचे मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. या अर्जाची प्रत, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा >>> भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी
संपर्क केंद्रामार्फत होणारी नावनोंदणी आता बंद… दहावीसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र प्रचलित पद्धतीमधील अडचणींचा, त्रुटींचा विचार करुन योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभदायी, सुलभ आणि विद्यार्थी केंद्रीत व्हावी या दृष्टीने सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्याची प्रचलित पध्दत बंद करून बारावीच्या विद्यार्थ्यांची ज्या पद्धतीने सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नाव नोंदणी अर्ज स्वीकारले जातात त्याप्रमाणेच दहावीच्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची पद्धत मार्च २०२४च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले.