गेल्या काही वर्षांत ढेपाळलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना ऊर्जितावस्था आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकी प्रवेशांसाठीचे अर्ज २६ हजारांनी वाढले असून, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
करोनापूर्व काळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेश रोडावले होते. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत होत्या. त्यामुळे शिक्षण संस्थांपुढे अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालवण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षीपासून अभियांत्रिकीच्या प्रवेशांना नवजीवन प्राप्त झाले आहे. मॅकेनिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, संगणक अभियांत्रिकी या पारंपरिक अभ्यासक्रमांसह कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा विज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा नव्या अभ्यासक्रमांचीही भर पडली आहे. विशेषत: संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रात परदेशात आणि देशातील नोकरीच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकीकडे कल पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> पिंपळेसौदागरमधील रस्ता खचल्यावर महापालिकेला जाग; आता नोटिसा पाठवण्याचा फार्स
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेतील सहभागी विद्यार्थ्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. गेल्या वर्षी एक लाख २९ हजार २८६ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले होते, तर यंदा एक लाख ७२ हजार १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील एक लाख ५६ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी : मनसेचे पालिकेसमोर आंदोलन… क्रिकेट स्टेडियम नको, दररोज पाणीपुरवठा करा!
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेश २०१० ते २०२१ या काळात कमी झाले होते. करोनानंतर माहिती-तंत्रज्ञान, संगणक अभियांत्रिकीला मागणी जास्त आहे. उद्योग क्षेत्राचाही वेगवेगळ्या स्वरूपात विस्तार होत आहे. त्यामुळे तांत्रिक क्षेत्रात रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीने होत आहे. त्याचा परिणाम अभियांत्रिकीच्या प्रवेशावर झाल्याचे वाटते. यंदा अभियांत्रिकीचे आजवरचे सर्वाधिक अर्ज आले आहेत. अर्ज वाढण्याबरोबरच जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होईल. नव्या शैक्षणिक धोरणातील लवचिकतेचाही येत्या काळात फायदा होईल.
– प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया
आजचे जग तंत्रज्ञानाभोवती फिरत आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा विद्यार्थ्यांचा कल तंत्रज्ञान, संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांकडे आहे. तसेच नोकरी मिळवण्यासाठी कौशल्यही आवश्यक आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा नव्या शाखा विकसित झाल्या आहेत. अभियांत्रिकीचे अर्ज वाढले असले, तरी स्थापत्य अभियांत्रिकी, मॅकेनिकल अशा पारंपरिक अभ्यासक्रमाकडे कल कमी राहील असे वाटते.
– डॉ. मनोहर चासकर, विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ