पुणे : महाबँकेत मराठी भाषेचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केलेली मागणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापनाने मान्य केली आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नवीन खाते उघडण्यासाठी तसेच बँकेतून पैसे काढण्यासाठीचे अर्ज आता मराठी भाषेतून उपलब्ध होणार आहेत.महाबँकेच्या कारभारात मराठीतून अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनाला यामुळे यश आले आहे.

महाराष्ट्रातील महाबँकेच्या सर्व शाखांमधून आवश्यक त्या सेवा मराठीतून उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी मुद्रित अर्जांचे नमुने मराठीमधून खातेदारांना उपलब्ध करून द्यावे; तसेच खातेदारांशी संवाद साधताना बँकेतील कर्मचाऱ्यांनीदेखील मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी दोन आठवड्यांपूर्वी मनसेच्या वतीने करण्यात आली होती.मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बँकेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक के. राजेशकुमार यांंची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने सर्व बँकांना मराठी भाषेतून अर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे परिपत्रक काढले आहे. मात्र, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अनेक शाखांमध्ये अद्यापही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मनसेच्या वतीने खातेदारांच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे मुद्रित नमुने मराठी भाषेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदन देण्यात आले होते. याची आवश्यक ती दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला होता.

मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये नवीन खाते सुरू करण्यासाठीचा अर्ज तसेच बँकेतून पैसे काढण्यासाठीचा अर्ज मराठीतून उपलब्ध करुन देण्यात आला आहे.महाबँकेच्या व्यवस्थापनाने याबद्दल माहिती दिली असून यापुढील काळात बँकांच्या शाखांमध्ये मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. आतापर्यंत केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अर्ज उपलब्ध होते, असे हेमंत संभूस यांनी सांंगितले.

Story img Loader