पुणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२साठी पुणे जिल्हा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे जिल्ह्याच्या बाहेरील जिल्हा किंवा शहरांतील कायमस्वरुपी रहिवासाचा पत्ता नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ ऑक्टोबरला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करताना उमेदवारांनी त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडले असले, तरी पुणे जिल्हा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे परीक्षेचे आयोजन सुरळीत होण्यासाठी पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे जिल्ह्याच्या बाहेरील जिल्हा किंवा शहरांतील कायमस्वरुपी रहिवासाचा पत्ता नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे, असे एमपीएससीने नमूद केले. तर या व्यवस्थेप्रमाणे प्रवेश देण्यात आलेले जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही सबबीखाली मान्यता करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader