पिंपरी : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघातून विद्यमान आमदारांसह प्रमुख पक्षातील इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. चारही मतदारसंघातून ६२ जणांनी १३४ अर्ज घेतले आहेत. मात्र, कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केेलेला नाही.

पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनीही अर्ज नेले आहेत. भोसरीतून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे, चिंचवड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज नेला आहे. शिवसेना (ठाकरे) मोरेश्वर भोंडवे, पिंपरीतून शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, देवेंद्र तायडे, राजू भालेराव, बाळासाहेब ओव्हाळ, मनोज गरबडे, मनोज कांबळे यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. मावळमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बापू भेगडे, कृष्णा दाभाडे यांनी अर्ज घेतले आहेत.

हेही वाचा >>>अजित पवार येत्या सोमवारी अर्ज दाखल करणार; बारामतीत काकापुतण्यामध्ये लढतीची शक्यता

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना (२२ ऑक्टोबर) रोजी प्रसिद्ध झाली. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात उमेदवारांच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील उमेदवारासह फक्त पाच जणांना प्रवेश आहे. या परिसरात मिरवणूक, सभा घेण्यास तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा, वाद्ये वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.