पुणे : मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत मिळविण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे गुरुवारी, शेवटच्या दिवशी ९६ हजार २५७ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी करून त्यांना चार समान हप्त्यामध्ये जास्त भरलेली रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान, यापुढे सवलतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या मिळकतधारकांना पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०२४ पासून सवलत देण्यात येणार आहे.
शहरातील निवासी मिळकतींना वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटल्यानंतर चालू आर्थिक वर्षापासून ही सवलत कायम ठेवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. मंत्रीमंडळ आणि विधानसभेतही त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ज्या मिळकतधारकांना वाढीव देयकांची नोटीस पाठविण्यात आली आहे आणि ज्यांनी थकबाकीसह वाढीव मिळकतकर भरला आहे, अशा सव्वातीन लाखांहून अधिक मिळकतधारकांसाठी योजना राबविण्यात आली होती. या योजनेची मुदत गुरुवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आली. त्यानुसार शेवटच्या दिवशी ९६ हजार २५७ एवढ्या मिळकतधारकांनी सवलतीसाठी अर्ज केल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा – कात्रजचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त
सवलतीची मुदत संपुष्टात आली असली तरी, निवासी मिळकतधारकांना सवलतीचा अर्ज करता येणार आहे. मुदतीनंतर अर्ज दाखल केलेल्या मिळकतधारकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून (१ एप्रिल २०२४) सवलतीचा लाभ दिला जाईल, असे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : संकल्प विकास यात्रेत ‘कसब्या’ला प्राधान्य?
मिळकतकरातील सवलत मिळविण्यासाठी पीटी-३ अर्ज भरून प्रशासनाला द्यावा लागणार आहे. मिळकतधारक स्वत: मिळकतीमध्ये रहात असलेल्यांनाच सवलत मिळणार असून सदनिकेचे पुराव्यांसह जवळच्या क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे २५ रुपये शुल्क अर्जासोबत जमा करावे लागणार आहे.