पुण्यातील पर्यटन वाढीस लागण्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करणारे सहल संयोजक (टूर ऑपरेटर), हॉटेल असोसिएशन, पर्यटन मार्गदर्शक (गाइड), कृषी पर्यटन अशा विविध भागधारकांची एक समिती तयार करावी. या समितीच्या बैठका घेऊन पर्यटन वाढीसाठी आवश्यक सूचना कराव्यात. या सूचना राज्य शासनाकडून अंमलात आणल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा दिली.
हेही वाचा- पुणे : टिळक रस्त्यावर तीन जणांकडून तरुणाला मारहाण; एकास अटक
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत पर्यटन मंत्री लोढा बोलत होते. ‘पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यांसारखे गडकिल्ले, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटक क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेची मदत घेऊन समिती स्थापन करावी.
हेही वाचा- पुणे : टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांत गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस
या समितीच्या बैठका घ्याव्यात. समितीने केलेल्या शिफारशी राज्य शासनाकडून अंमलात आणल्या जातील. जेणेकरून पुणे जिल्ह्यातील पर्यटन वाढीस लागेल. पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, पर्यटन क्षेत्रात कार्यरत सहल संयोजक, हॉटेल असोशिएशन, पर्यटन मार्गदर्शक आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
आयटीआयचा आढावा
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पायाभूत सुविधांचा आढावा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला. कौशल्य विकासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका, खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक ‘कौशल्य केंद्र’ सुरू करा, जिल्ह्यातील सर्व आयटीआय अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह खासगी क्षेत्राचेही योगदान घेण्यासाठी प्रयत्न करा, आयटीआय अद्ययावतीकरणात खासगी क्षेत्र कशा पद्धतीने सहभाग देऊ शकेल याबाबत जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी, अशा सूचना लोढा यांनी यावेळी केल्या.