पुणे : पुणे प्रांताच्या धर्मगुरुपदी बिशप जाॅन राॅड्रीग्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोम येथील व्हॅटिकन सिटी येथून पोप फ्रान्सिस यांनी बिशप डाॅ. थाॅमस डाबरे यांच्या राजीनाम्याचा स्वीकार करून मुंबई येथे बिशप म्हणून कार्यरत असलेल्या जाॅन राॅड्रीग्ज यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
बिशप डाबरे म्हणाले, चर्चच्या नियमांनुसार बिशप यांनी ७५ व्या वर्षी सेवानिवृत्ती घ्यायची असते. वयाच्या ७४ व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर मी राजीनामापत्र पाठवून दिले होते. त्याला तीन वर्षे झाली. नव्या बिशपची नियुक्ती होईपर्यंत मला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते. आता नव्या बिशप यांची नियुक्ती झाली असल्याने माझा राजीनामा मंजूर झाला आहे.
हेही वाचा >>> हाॅकी खेळताना झालेल्या वादातून महिला आणि तीन मुलींना मारहाण; तीनजण अटकेत
बिशप राॅड्रीग्ज यांचा जन्म २१ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई येथे झाला असून त्यांनी १८ एप्रिल १९९८ रोजी संतपदाचे शिक्षण पूर्ण केले. रोम येथील पाँटिफिकल लॅटरन विद्यापीठातून तीन वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांची आधी सहायक बिशप म्हणून आणि नंतर बिशपपदी नियुक्ती करण्यात आली. बिशप राॅड्रीग्ज हे २०१९ पासून ‘सीसीबीआय (काॅन्फरन्स ऑफ कॅथलिक बिशप ऑफ इंडिया) कमिशन फाॅर बायबल’चे सदस्य आहेत. सध्या ते मुंबईतील बांद्रा येथील माऊंट मेरी चर्च (बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट) येथे कार्यरत आहेत.