पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या निवड समितीवर असलेले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समितीकडून निवड झालेले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांची नियुक्तीही वादग्रस्त ठरण्याची कुजबूज विद्यापीठामध्ये सुरू झाली आहे.
डॉ. कडू यांची पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड करणाऱ्या समितीवर डॉ. सपकाळ हे सदस्य होते. मात्र, आचा डॉ. सपकाळ यांच्या नागपूर विद्यापीठावरील कुलगुरूपदी नियुक्तीला आव्हान देण्यात आले आहे. त्यांनी चुकीची कागदपत्रे सादर केली होती, अशी तक्रार नागपूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद अभ्यास विभागाचे माजी प्रमुख सुनील मिश्रा यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही तक्रार दाखल करून घेतली व त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. नरेंद्र कडू यांची नुकतीच नियुक्ती झाली. डॉ. सपकाळ हे कुलसचिवांच्या निवड समितीचे एक सदस्य होते. निवड समितीने कुलसचिवपदाच्या मुलाखती २० फेब्रुवारीला घेतल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच ९ फेब्रुवारीला डॉ. सपकाळ यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. डॉ. सपकाळ यांच्यावरील आरोप खरे ठरल्यास ते कुलसचिवांच्या निवड समितीचे सदस्य म्हणून पात्र ठरू शकत नाहीत. त्यामुळे कुलसचिवांची नियुक्तीही अवैध ठरू शकते. विद्यापीठाने कुलसचिवांच्या निवडीबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट सादर केले असल्यामुळे याबाबत अजून कोणी आव्हान दिलेले नाही. मात्र, आता या पाश्र्वभूमीवर कुलसचिवांच्या नियुक्तीला आव्हान देण्याबाबत विद्यापीठामध्ये हालचाली सुरू झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of registrar of pune uni dr narendra kadu now in dispute
Show comments