एक्स्प्रेस रेल्वे लोहमार्गावरून धावत असताना रुळांमधून येणाऱ्या आवाजातून त्याला दुर्घटनेची शक्यता जाणवली. प्रसंगावधान राखून त्याने तातडीने त्याची सूचना संबंधितांना दिली. तपासणी होताच रूळांना गंभीर तडा गेल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पुणे रेल्वे विभागातील या रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानाचा मध्य रेल्वेने गौरव केला असून, त्याला रेल्वे महाव्यवस्थापक पुरस्कार देण्यात आला आहे.
हेही वाचा >>>१३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय
कोमल असटकर, असे या रेल्वे चालकाचे (लोको पायलट) नाव आहे. असटकर हे गेल्या २० वर्षांपासून रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. ते सध्या पुणे रेल्वेमध्ये लोको पायलट या पदावर काम करीत आहेत. २० नोव्हेंबरला यशवंतपूर- चंडीगड या एक्स्प्रेसमध्ये हे कर्तव्यावर होते. रहतमपूर येथून पुढे जात असताना गाडीमध्ये त्यांना असामान्य अवाज ऐकू आला. रेल्वेची चाके आणि रूळ याच्या घर्षणातून येणाऱ्या आवाजापेक्षा काहीसा वेगळा आवाज त्यांनी हेरला. प्रसंगावधान राखून त्यांनी पुढील स्थानकात कोरेगाव येथे गाडी थांबविली. या आवाजाबाबत त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली. त्यामुळे तापासणी आणि सुरक्षा यंत्रणांची पथके तातडीने असटकर यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तेथे पाहणी केली असता. रुळांना गंभीर तडा गेल्याचे लक्षात आले. ही बाब तातडीने लक्षात आल्यामुळे या मार्गावर पुढील गाड्यांबाबतची मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा >>>भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना
असटकर यांनी केवळ रेल्वेचा असामान्य आवाज लक्षात घेऊन सजगतेने मोठी दुर्घटना टाळण्यास हातभार लावला. या गोष्टीची मध्य रेल्वेने दखल घेतली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते त्यांना महाव्यवस्थापक पुरस्कार देण्यात आला. अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंह, मुख्य सुरक्षा अधिकारी डी. वाय. नाईक, मुख्य वाहतूक व्यवस्थापक मुकुल जैन, मुख्य अभियंता राजेश अरोरा आदी त्या वेळी उपस्थित होते. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष राहून करण्यात येणारे काम नेहमीच प्रेरणादायक ठरेल, असे लाहोटी या वेळी म्हणाले.