स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला असून त्याअनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालिकेच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. अ क्षेत्रीय कार्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार झाला. इ क्षेत्रीय कार्यालयाला द्वितीय क्रमांक आणि ह क्षेत्रीय कार्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. या प्रभागांचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, विजय थोरात यांचा आयुक्तांनी सत्कार केला. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन करणे, सार्वजनिक क्षेत्रातील साफसफाई करणे, प्लास्टिकचा कमी वापर किंवा बंदी, महापालिकेच्या सफाई कामगारांना लाभ देणे, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान प्रत्येक महिन्याला किमान एक शून्य कचरा कार्यक्रम राबविणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशा निकषांच्या आधारावर त्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते.