कथक, भरतनाटय़म, कुचिपुडी यांसह लोकनृत्य अशा विविध नृत्यप्रकारांचा अनोखा मिलाफ रसिकांनी जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधून सोमवारी अनुभवला.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे जागतिक नृत्यदिनानिमित्त ‘नृत्योत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार आणि महापालिका शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे या प्रसंगी उपस्थित होते. साधना कथक नृत्यालयाच्या संचालिका चित्रा जोग, नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या संचालिका राजसी वाघ, भरतनाटय़म नर्तक पवित्र भट, दीक्षा कथक केंद्राच्या आभा वांभुरकर, नृत्यप्रिया कुचिपुडी नृत्यालयाच्या गायत्री आंबेकर या कलाकारांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, सचिव हेमंत वाघ, श्याम भुर्के या वेळी उपस्थित होते.
मनीषा साठे म्हणाल्या, आपल्या देशामध्ये नऊ शास्त्रीय नृत्यप्रकार आणि लोकनृत्याचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. तरीही हीन नृत्याकडे आपण का वळतो. श्रद्धा, निष्ठा, सातत्य यांच्या मिलाफातून ध्यास घेतला, तर कोणताही नृत्यप्रकार आत्मसात करणे अवघड नाही.
कीर्ती शिलेदार म्हणाल्या, आम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी भारतीय मातीची परंपरा उपयोगी पडते. कला व्यक्तिमत्त्व घडवितात. माणसाला नम्र बनवितात आणि माणुसकी शिकवितात.
रसिकांनी अनुभवला विविध नृत्यप्रकारांचा मिलाफ
कथक, भरतनाटय़म, कुचिपुडी यांसह लोकनृत्य अशा विविध नृत्यप्रकारांचा अनोखा मिलाफ रसिकांनी जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधून सोमवारी अनुभवला.
First published on: 30-04-2013 at 02:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appreciators experienced harmony of diff sorts of dance