पुणे : शहरातील ३८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी १४२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे महापालिकेच्या पथ विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये सर्वात खराब झालेल्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ही कामे येत्या आठवडाभरात सुरू होणार आहेत. त्यातच आता ३८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचीही दुरुस्ती आणि डांबकीरण करण्यात येणार आहे. त्याच्या खर्चाला पूर्वगणन समितीकडून मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा: आळंदीत वैष्णवांचा मेळा; ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

पथ विभागाने दुसऱ्या टप्प्यात ९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी २६० कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. कोणत्या रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक आहे, याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सूचना आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी पथ विभागाला दिले होते. त्यानुसार मुख्य खात्याकडील ३० किलोमीटरच्या ३४ रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती होणार आहे. धायरी, कोथरूड, औंध, कात्रज, हडपसर, नगर रस्ता यासह शहराच्या सर्व भागातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या कामासाठी १३० कोटींचा खर्च येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ७.८ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यासाठी १२ कोटी रुपयांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. असा एकूण १४२ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appropriation committee approval for pune city road repairs pune print news tmb 01