पुणे : राज्यातील औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची मान्यता, प्रवेश क्षमतेतील वाढीसंदर्भात राज्य शासनाची मान्यता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली असून, आता नवे सरकार अस्तित्वात आल्यावरच शासन निर्णयांची प्रक्रिया होऊ शकणार आहे. मात्र, यात प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊन विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्यास फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात समाइक प्रवेश परीक्षातर्फे (सीईटी सेल) औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यानुसार सीईटी सेलने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. दोन फेऱ्यांमध्ये पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे ६० टक्के जागांवर प्रवेश देण्यात आले. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) नवीन फार्मसी महाविद्यालयांना परवानगी दिली. तसेच, काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू लागल्याने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. आता नवे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर शासन निर्णय प्रसिद्ध केल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. मात्र, उर्वरित प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांचे पहिले सत्र पूर्ण करून परीक्षा घेण्यास आणखी विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा…मराठी चित्रपटांना दिशा देणारा अनोखा प्रयोग… पुण्यात प्रायोगिक नाट्यगृहात चित्रपटाचे खेळ…

दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ म्हणाले, की औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यातून सुमारे ५० ते ६० टक्के जागा भरण्यात आल्या. आता तिसऱ्या फेरीनंतर रिक्त जागांवर संस्थास्तरावर प्रवेश दिले जातील. वास्तविक या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यापेक्षा असलेल्या जागांवर प्रवेश देऊन प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे होते. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Approval for pharmacy college courses and increased admission capacity is pending due to election code pune print news ccp 14 sud 02