लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आणि इटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यासाठी पाचशे किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरात टाकण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आणि महाप्रीतकडून केबल्स टाकण्यात येणार आहे. यातील २३० किलोमीटर लांबीच्या अंतरात एकाचवेळी खोदाई होणार असल्याने दोन्ही यंत्रणा केबल टाकण्याचे काम एकत्रित करणार असून महाप्रीतकडून रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित लांबीच्या रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरणासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे.
पुणे पोलीस सिटी सर्व्हेलन्स प्रकल्पाअंतर्गत शहरात अत्याधुनिक सीसीटीव्हींचे जाळे निर्माण करणार आहेत. तर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत केंद्राकडून मिळालेल्या निधीतून महाप्रीततर्फे शहरात आयसीसीसीची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही यंत्रणांना प्रत्येकी पाचशे किलोमीटरची खोदाई करावी लागणार आहे. दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्रपणे खोदाई केल्यास शहरातील रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पथविभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांची चर्चाही झाली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी मंगळवारी पोलीस अधिकारी आणि महाप्रीतच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यामध्ये दोघांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाप्रीत आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांना सुमारे २३० किलोमीटर लांबीच्या केबल्स एकाच परिसरात टाकायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही यंत्रणांना एकाच वेळी केबल टाकण्याचा पर्याय देण्यात आला आहे. केबल टाकून झाल्यानंतर महाप्रीत रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करून देणार आहे. त्याचबरोबर मिशन १७ अंतर्गत महापालिका सुमारे ८० किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. त्यापूर्वीच दोन्ही यंत्रणांनी केबल टाकून घेतल्यानंतर या रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण केले जाईल. या निर्णयाला दोन्ही कंपन्यांनी होकार दर्शवला आहे,’ असे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले. या दोन्ही खोदाईसाठी ३६.६ मीटरचा छेद घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ‘मायक्रो टनेलिंग’ तंत्रज्ञानाद्वारे हे काम करावे, अशी सूचना दोन्ही यंत्रणांना करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या खोदकामासाठी शुल्क आकारणीसंदर्भात विचारविनिमय सुरू होता. मात्र, आता सुमारे ३१० किलोमीटरच्या रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरणाचा प्रश्न सुटणार आहे. पुणे पोलिसांचा प्रकल्प तसेच आयसीसीसी पुण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प असल्याने उर्वरित रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरणासाठी राज्य शासनाने निधी द्यावा, यासाठी नगरविकास आणि गृह मंत्रालयाकडे मागणी केली जाईल, असेही पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांची खोदाईही मोठ्या प्रमाणावर सुरू असून मेट्रो, उड्डाणपुलांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच नव्याने पाचशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई प्रस्तावित आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का आणि रस्त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेत होणार का, हा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.