पुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करीअरचे क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी मोफत कलचाचणीचा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. मात्र पुन्हा कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना विद्यार्थ्यांना करीअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मोफत कलचाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एका संस्थेशी करार करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित संस्थेमार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्याचे निष्कर्ष जाहीर केले जात होते. मात्र गेली तीन वर्षे ही कलचाचणी बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर कलचाचणी बंद करण्याची कारणे काय, कलचाचणी पूर्ववत सुरू करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात येत आहे याबाबतचे प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांकडून उपस्थित करण्यात आले.

राज्य सरकारचा संबंधित संस्थेबरोबरचा करार २०२० मध्ये संपुष्टात आल्याने कलचाचणी बंद करण्यात आली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात दिली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी कलचाचणी पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aptitude test for class 10 students in the state closed pune print news ccp 14 ysh