पुणे : ‘अलीकडे सगळीकडे ‘युज मी, थ्रो मी’ असे विविध प्रकारचे फलक लावलेले दिसतात. अन्नाकडे, पाण्याकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जाते. समाजाला केवळ देखावा आवडतो. त्याला वरवरची सुशोभित वास्तुरचना हवी आहे. यातून आपला समाज अधिक व्यवसायकेंद्री होतो आहे. माणसा-माणसातला दुरावा वाढत चाललेला आहे. सीमेवरूनही संघर्ष सुरू झालेले दिसतात. वास्तविक या सीमा मानवनिर्मित असतात. राष्ट्र-राष्ट्रप्रेम यातून केवळ हिंसेचा जन्म होतो,’ असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष बेरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

सुमित्रा भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सति भावे आणि परिवारातर्फे दिला जाणारा ‘दिठी समाजभान पुरस्कार’ यंदा कलात्मक वास्तूंच्या माध्यमातून माणसाला निर्सगाशी जोडणाऱ्या, त्याला चांगुलपणाचा स्पर्श देण्यासाठी नव्या सृजनाचा मार्ग स्वीकारणारे लेखक, कवी आणि वास्तुरचनाकार बेरी यांना देण्यात आला. डॉ. शेखर कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, वीरेंद्र वळसंगकर आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात सुकथनकर आणि वळसंगकर यांनी बेरी यांच्याशी संवाद साधला. बेरी यांचे काम उलगडणारे ‘अनफोल्डिंग व्हाइट’ व ‘उरू’ हे वळसंगकर यांनी दिग्दर्शित केलेले लघुपटही दाखविण्यात आले.

‘निर्सगाबरोबर अंतर्मनाचा शोध घेत पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात सगळा हव्यास गळून पडतो. समाधानी, साधी, सचोटीची जीवनशैली सहजच अंगीकारली जाते,’ असे सांगून बेरी म्हणाले, ‘समाजाचा बाह्य अवकाश अंतरवकाशाने प्रभावित होत असतो. त्याचप्रमाणे बाह्य अवकाशाचा परिणाम आपल्या आंतरिक जडणघडणीवर होत असतो. अंतर्मन आणि बाह्य अवकाश या दोन्हींत सातत्याने संवाद घडत असतो. माझ्या जगण्याचा मूलभूत दृष्टिकोन माणूसकेंद्री आहे. त्यामुळे माणसाला चांगुलपणाचा-निर्सगाचा स्पर्श व्हावा, माणसा-माणसात वाढत चाललेला दुरावा कमी होऊन वैश्विक ऊर्जेशी त्याची नाळ जोडली जावी, यासाठी निर्सगाला धक्का न लावता, त्यातले सौंदर्य हेरून वास्तू उभारण्याचे काम मी करतो.’

Story img Loader