केंद्रात व राज्यात ‘सहकारी’ पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी आघाडी धर्माची पायमल्ली, त्यामुळे काँग्रेसची होत असलेली मुस्कटदाबी आणि काँग्रेस पक्षसंघटनेतील विस्कळीतपणा व त्यामुळे होणारे नुकसान हे विषय पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर प्रामुख्याने मांडले. वर्षांनुवर्षे होत असलेल्या त्याच तक्रारींचे आता तरी काही होईल, की पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ची परिस्थिती राहील, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी धर्माशी प्रामाणिक राहत नाही, त्यांचे नेते अन्य विरोधी पक्षांना सोडून काँग्रेसलाच ‘टार्गेट’ करतात. सत्ता असून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, शासकीय यंत्रणा राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे, राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने काँग्रेसचे नुकसान होते. त्यापेक्षा स्वतंत्रपणे लढावे, असा सूर अनेक जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तेव्हा आघाडी नको असल्यास स्वतंत्रपणे सत्ता मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. संघटनात्मक पातळीवर नेत्यांचे, मंत्र्यांचे दुर्लक्ष होते व त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, याकडे कार्यकर्त्यांनी राहुल यांचे लक्ष वेधले. तेव्हा त्यांनी मंत्र्यांनाही तंबी दिली व कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, असे बजावले. वास्तविक अशा तक्रारी यापूर्वी सातत्याने झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत तरी काहीही फरक पडला नाही. आता राहुल यांच्यासमोर नव्याने तक्रारींचा पाढा वाचण्यात आल्यानंतर काही तरी सकारात्मक चित्र पुढे येईल, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो आहे.  
काँग्रेस परंपरेप्रमाणे राहुल गांधी यांचा एखाद्या भागात दौरा झाल्यानंतर तेथे काहीतरी ठोस निर्णय होतात, असे सांगितले जाते. तसे झाल्यास कार्यकर्त्यांनी मांडलेले विविध मुद्दे, मंत्रिमंडळातील फेरबदल, पक्षसंघटनेत नवे चेहरे की आणखी कोणते निर्णय होतील, याविषयी उत्सुकता आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून माणिकराव ठाकरे यांची उचलबांगडी होणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने माणिकराव पदावर कायम आहेत. प्रदेशाध्यपद सोडावे लागले तर मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी त्यांनी ‘फिल्डींग’ लावलेली आहे. मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या वाटणीची तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही पदे तशीच ठेवण्यात येत आहेत. शासकीय कमिटय़ांचे वाटप रखडलेले आहे. सत्ता असूनही अनेक निर्णय रखडवून ठेवले आहेत, या सर्वाना दौऱ्यामुळे चालना मिळेल का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
मावळची आश्वासने हवेतच?
पवना बंद नळ योजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला, त्यानंतर राहुल गांधी मावळात आले होते. मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत एका दशक्रिया विधीतही ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री आले होते का, अशी आवर्जून विचारणा त्यांनी शेतकऱ्यांना केली होती. पोलिसांचा गोळीबार अन्यायकारक असल्याचे नमूद करून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात त्यांची आश्वासने हवेतच विरल्याचे मावळवासीय सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा