पुणे : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यात वाद सुरू झाला असतानाच त्यामध्ये कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी उडी घेतली आहे. मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त सातत्याने मोडत असल्याचा आरोप करत पुनीत जोशी यांनी मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळले आहेत. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी लढाईत त्यांच्या समवेत कायम राहिलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले असून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यासंदर्भात वेळ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. मात्र, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कोथरूडच्या माजी आमदार, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कुलकर्णी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. तसेच नितीन गडकरी यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे वाद संपला असे वाटत असतानाच मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी या वादात उडी घेतली आहे.

मेधा कुलकर्णी यांच्याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पक्ष शिस्त सातत्याने मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे छायाचित्र नाही, हा त्यांचा आक्षेप होता. मात्र शहरातील २४० जाहिरात फलकांवर त्यांचे छायाचित्र होते, ही बाब त्या दुर्लक्षित करत आहेत. साधारण नाराजी असली तरी ती जाहीर करायची नाही, अशी पक्षाची शिकवण आहे. आधी पक्ष नंतर व्यक्ती ही पक्षाची विचारधारा आहे. मात्र ती दुर्लक्षित करून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे आश्चर्य वाटत आहे, अशी भूमिका जोशी यांनी समाजमाध्यमात मांडली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argument between guardian minister chandrakant patil and former mla medha kulkarni over taking credit for the work of chandni chowk flyover pune print news apk 13 amy
Show comments