राजा ठाकरे (विशेष सरकारी वकील) यांचा युक्तिवाद-
दहशतवादाची राक्षसी प्रवृत्ती जगभरात पसरत आहे. भारतातही अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध पुकारण्यात आलेले हे युद्ध आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाची घटना ही दुर्मीळातील दुर्मीळ असून बेगने दहशतवादी कृत्य केले आहे. यामागे लोकांच्या मनात भीतीचे आणि असुरक्षिततचे वातावण निर्माण करून त्यांच्यात दहशत निर्माण करणे हा या कृत्यामागील उद्देश आहे. दहशतवादी कृत्य करणाऱ्यांमध्ये योग्य संदेश जाण्यासाठी बेगने केलेल्या कृत्याला फाशीचीच शिक्षा योग्य आहे. फाशीच्या शिक्षेवर अनेक मतप्रवाह आहेत. पण सर्व घटनांना काही एकच नियम लागू होत नाहीत. १९९३ स्फोटात फाशीची शिक्षा सुनावल्या वेळी आरोपी याकुब मेनन याचे वय ३३ वर्षे होते.  फाशीची शिक्षा सुनावताना आरोपीचे वय लक्षात घ्यावे याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे नियम आहेत. पण मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी कसाब याला फाशी सुनावली त्यावेळी त्याचे वय २३ वर्षे होते. त्यामुळे आरोपीचे वय हा बचाव होऊ शकत नाही. बेग हा शिक्षक असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, त्याने लोकांना जिहाद शिकवला. याकुब मेनन हा सीए होता. त्यामुळे आरोपी कोण हे पाहण्यापेक्षा त्याने केलेले कृत्य पहाणे गरजेचे आहे. बेगने आपले कुटुंबीय गरीब असल्याचे सांगितले. पण असे कृत्य करताना त्याला कुटुंब आठवले नाही का, त्याने इतरांची कुटुंबं उद्ध्वस्त केली. बेगचा या कृत्यात सहभाग असल्याने कठोर शिक्षा द्यावी. त्यामधून पीडित व्यक्ती आणि समाजाचे समाधान होईल, असा युक्तिवाद ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी न्यायालयात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले सादर केले.

अॅड. ए. रेहमान (बेगचे वकील) यांचा युक्तिवाद-
बेग हा जर्मन बेकरीत कधी गेलेला नाही. यासीन भटकळ याने बॅग ठेवली आहे. मार्च २००८ मध्ये या गुन्ह्य़ाचा कट कोलंबोमध्ये रचला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. मात्र, तपास अधिकारी कोलंबोला जाऊन तपास करण्यात अपयशी ठरले आहेत. या गुन्ह्य़ातील आरोपी अबु जुंदाल याला अटक करण्यात आली आहे. पण त्याला या गुन्ह्य़ात न्यायालयात हजर केलेले नाही. बेगचा या गुन्ह्य़ात थेट संबंध दिसून येत नाही. आरोपी हा तरूण असून तो सुशिक्षित आहे. त्याने बीए डीएड केले असून शिक्षक आहे. बेगच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचे कुटुंब त्याच्यावर आवलंबून आहे.  तो सराईत गुन्हेगार नाही. या सर्व गोष्टीचा विचार केल्यास हा गुन्हा दुर्मीळातील दुर्मीळ ठरत नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा देऊ नये, असा युक्तिवाद बेगचे वकील ए. रेहमान यांनी केला. त्यासाठी त्यांनी न्यायालयात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले.