पुणे : शत्रूच्या हल्ल्यात ९४ मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये सेवेत असलेले पुण्यातील जवान दिलीप बाबासाहेब ओझरकर शहीद झाले. दिलीप ओझरकर हे भवानी पेठ येथे वास्तव्यास असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (५ सप्टेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भवानी पेठ येथे वास्तव्य असलेले दिलीप ओझरकर हे १५ एप्रिल २००४ मध्ये लष्करी सेवेत दाखल झाले होते. सध्या ते ९४ मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये हलावदार या पदावर सेवेत होते. कारगिल ते लेह या दरम्यान प्रवास करत असताना शत्रूने केलेल्या हल्ल्यामध्ये दिलीप ओझरकर शहीद झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले.
मंगळवारी (५ सप्टेंबर) भवानी पेठ येथील भवानी माता मंदीर येथून सकाळी सात वाजता शहीद दिलीप ओझरकर यांची अंत्ययात्रा निघणार असून गोळीबार मैदानाजवळील धोबीघाट स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.