पुणे : वैमनस्यातून कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूर गणेश अडागळे (वय १९), मंथन प्रकाश सकट (वय १९, दोघे रा. पीएमपी काॅलनी, कागदीपूरा, कसबा पेठ), ओम देवीदास शिंदे (वय १९, रा. शिंदे वाडा, पारगे चौक, मंगळवार पेठ), सोहम राजेंद्र हराळे (वय २०, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, कवडेवाडी, कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासीन इम्तियाज शेख (वय २९, रा. राम रहिम मित्र मंडळाजवळ, कागदीपूरा, कसबा पेठ) याने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याची गेल्या वर्षी आरोपी अडागळे, सकट यांच्याशी भांडणे झाली होती. भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी मध्यरात्री अडागळे, सकट, हराळे, शिंदे आणि अल्पवयीन साथीदारांनी कागदीपूरा भागात कोयते उगारुन दहशत माजविली. तक्रारदार शेख यांच्या रिक्षाची काच फोडली. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या दोन दिवसात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या. बिबवेवाडी भागात वैमनस्यातून तिघांनी २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. येरवडा भागात तोडफोडीची घटना घडली. बिबवेवाडी, येरवडा, कसबा पेठ भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. गुंडाांची धिंड काढा, असे आदेश दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तोडफोड करणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.