लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: आर्थिक व्यवहारातून एका खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली.
इशान अरविंद कदम (वय ३१, रा. वारजे), सौरभ सुनिल गोरे (वय ३०, रा. उंड्री) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कमलेश लांडगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पाटील (रा. हॅप्पी कॉलनी, कोथरुड) श्रीराम फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. विमा व्यवसायातील एजंट इशान कदम याच्याशी त्यांचा आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. ८ जून रोजी इशान कदम आाणि सौरभ गोरे राकेश पाटील यांच्या घरी गेले. त्यांना मारहाण करुन मोटारीतून अपहरण केले. पाटील यांचे मित्र आणि कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
आणखी वाचा- पालखीदरम्यान चोरणार होते वारकऱ्यांचे मोबाईल, पुणे पोलिसांनी ‘असा’ हाणून पाडला डाव
त्यानंतर आरोपींनी पाटील यांना बाणेर -हिंजवडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांना मध्यरात्री कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीत नेले. तेथील एका सदनिकेत त्यांना डांबून ठेवले. पाटील यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पथकाने तपास सुरुकेला. तांत्रिक तपासात पाटील खेड शिवापूर भागात असल्याची माहिती मिळाली. पोलीस मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागल्यानंतर ९ जून रोजी सकाळी पाटील यांना कर्वेनगर भागातील वनदेवी मंदिराजवळ मोटारीतून सोडून आरोपी पसार झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपी कदम, गोरे यांना पकडले.
पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक सूर्यकांत सतपाळे, गणेश चव्हाण,सिद्धराम कोळी, सोमेश्वर यादव, आशिष राठोड, धीरज पवार, निशीकांत सावंत, हरीष गायकवाड,नितीन राऊत, महेश निंबाळकर, योगेश झेंडे आदींनी ही कारवाई केली.