गुन्हेगारी जगताचे आकर्षण आणि पिस्तुल विक्रीतून चैन पुर्ण करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून ७ देशी बनावटीचे पिस्तुल आणि २८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. योगेश बाजीराव दौंडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेश मधून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पुणे जिल्ह्यात कमी किंमतीत विकायचा त्यामधून त्याला पैसे आणि आवड पूर्ण केल्याचं समाधान मिळत होत अशी माहिती गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,आरोपी योगेश बाजीराव दौंडकर वय-३५ रा.शेल पिंपळ गाव ता.खेड जि.पुणे हा मंगळवार रोजी मोशी परिसरात पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची खात्रेशीर माहिती गुन्हे शाखा दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार मोशी परिसरातील जुना जकात नाका येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने सापळा रचला. एम.एच-१४ डी.आर-९३२२ या क्रमांकाची दुचाकी घेऊन आरोपी हा पुणे नाशिक रोडवर थांबला असता त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याकडे २ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ११ जिवंत काडतुसे आढळली.

आरोपी योगेश बाजीराव दौंडकर याच्यावर गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर करण्यात आले.आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्या दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू ठेवली.  आरोपी योगेशने आणखी देशी बनावटीचे पिस्तुल विकण्यासाठी आणल्याचे सांगितले.ते चांदुस कोरेगाव ता.खेड जि. पुणे येथील फार्म हाऊसवर ठेवली असल्याचे निष्पन्न झाले.गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी गेले आणि लपवून ठेवलेले ५ देशी बनावटीचे पिस्तुलसह १७ जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी योगेशवर या अगोदर गुन्हे दाखल नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले असून तो केवळ गुन्हेगारी जगताची आवड म्हणून पिस्तुल विकत असल्याचं सांगितलं आहे.परंतु पिस्तुल विक्रीची आवड एखाद्याच्या जीव घेऊ शकते.उत्तर प्रदेश येथून आणलेले हे देशी बनावटीचे पिस्तुल १५ ते २० हजार रुपयात विकत होता.ज्याची उत्तर प्रदेशात केवळ पाच हजार रुपये किंमत आहे.ही कामगिरी गुन्हे शाखा दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested man in pune criminal sold pistol illegal
Show comments