तानाजी काळे
इंदापूर : हिमालयातील कैलास मानसरोवरला भेट देणाऱ्या पर्यटकांना हमखास दर्शन देणाऱ्या पट्टकदंब हंस या देखण्या पाहुण्या पक्ष्यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाच्या शिवारात पसरलेल्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गर्दी केली आहे. हिमालयातील नितळ सरोवरातील साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे हे हंस पक्षी हिवाळ्यात राज्यात बहुसंख्येने येऊन दाखल होतात. पळसदेव गावाच्या पळसनाथाच्या दारी हे हंस सध्या दिमाखदार चालीने वावरताना दिसत आहेत.
पट्टकदंब हंस, कदंब हंस आणि पट्टेरी राजहंस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परदेशी पाहुण्यांना इंग्रजीत ‘बार हेडेड गूज’ असे म्हणतात. पट्टकदंब हंस याचे शास्त्रीय नाव ‘अन्सर इंडीकस’ असे असून ते पावसाळ्याच्या प्रारंभी लेह आणि लडाख या परिसरातील जलस्थानांवर वीण घालतात. सुमारे १८ ते २५ वर्षे वयोमान लाभलेले हे हंस नेहमी समूहाने वावरत असतात. या पक्ष्यांचा डोक्यावर दोन्ही बाजूला दोन गडद काळपट पट्टे असतात. या कारणामुळे या पक्ष्यांना पट्टकदंब हंस हे नाव रूढ झाले आहे. पांढरेशुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्टे या ऐटबाज हंसाना ओळखण्याच्या खुणा आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेल्या या हंसातील चोच गुलाबी असते. पाय नारंगी पिवळे असतात. राखी रंगाच्या पंखावर काळे पट्टे असतात. शेपटीचे मूळ आणि टोक शुभ्र असते.
हे हंस हिवाळ्याच्या प्रारंभी भारतातील पठारी प्रदेशातील जलस्थानावर उदरनिर्वासाठी येऊन दाखल होतात. उन्हाळ्याची चाहूल लागली की हे हंस आपल्या मूळस्थानाकडे परत जातात. आपल्या भागातील जलाशयांचे किनारे पाण्यापासून मुक्त झालेल्या हिरवळीवर हे पक्षी चरत असतानाचे दर्शन मनोहारी वाटते. पहाटेच्या वेळी हे हंस आवाज करत एकमेकांना साद घालत असतात. हा आवाज कर्णमधुर वाटतो. हे पक्षी नेहमी समूहाने खाद्यान्न शोधत असतात. खाद्यावर ताव मारताना काही कारणाने एकदम थव्याने उड्डाण घेतल्यावर सूर्यप्रकाशात त्यांच्या पंखाखालील कातडीची चमक पक्षी निरीक्षकांना मोहित करते.
हेही वाचा >>> पुरंदर विमानतळ घेणार ‘उड्डाण’, मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा
उजनी धरण निर्मितीनंतर हे हंस पक्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बहुसंख्येने वावरताना दिसून येत होते. मात्र, जलाशय परिसरात मानवी वावर वाढल्यामुळे पक्ष्यांची संख्या रोडावत चालली आहे. दुपारच्या वेळी हे पक्षी जलाशयाच्या काठावर आडोशाला विश्रांती घेत असतात. अशा बेसावध वेळी या पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता असते. या हंसांच्या भयमुक्त वातावरणात वावरण्यासाठी धरण परिसरात पोषक वातावरण निर्माण करून द्यायला पाहिजे.