पुणे: आले रे आले गणपती आले, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, आपला गणपती शारदा गणपती म्हणताना मंडईकरांचा अमाप उत्साह, ढोल ताशांचा दणदणाट,गणरायावर होणारी फुलांची उधळण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंडईच्या बाप्पाचे फुलांनी सजलेल्या ओंकार रथातून पारंपरिक थाटात शारदा गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३० वे वर्ष आहे. गुरुपरंपरेची महती सांगणाऱ्या स्वामी दरबारात गणरायांची प्राणप्रतिष्ठापना झाली. दुपारी १२.३० वाजता ॲड. पराग एरंडे आणि अनुराधा एरंडे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, योगेश गोगावले, मदन थोरात, जयंत किराड, अॅड.प्रताप परदेशी उपस्थित होते.
आणखी वाचा-पिंपरी: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन
तर आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळ, मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप अशी मिरवणुक काढण्यात आली. तर यावेळी समर्थ ढोल पथक आणि आवर्तन ढोल पथक ही वाद्य पथके आणि न्यू गंधर्व बँड यांनी वादन केले.