डेक्कन स्थानकावर पीएमपी बसमध्ये चढत असताना खाली पडल्याने सौभाग्या या युवतीचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटायच्या आधीच या स्थानकावर बसचालक-वाहक आणि व्यवस्थापकांचासुद्धा बेपर्वा कारभार सुरू झाला आहे. कारण याच स्थानकावर शुक्रवारी सकाळी एक युवती आणि तिची आई पीएमपी बसमधून पडली.. पण चालकाने थांबायची तसदी न घेता बस तशीच दामटली, त्यानंतर या दोघी वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या असता तेथील व्यवस्थापकांनी त्यांचीच अक्कल काढली.
सौभाग्या पुजारी ही युवती डेक्कन बसस्थानकावर गुरुवारी दुपारी बसमधून खाली पडली आणि तिच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली गेली आणि काही उपाय करण्यात येणार असल्याचेही बोलले गेले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे शुक्रवारी सकाळच्या अनुभवावरून स्पष्ट झाले. या स्थानकावर सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्या वेळी तिथे वारजे-माळवाडीला जाणारी बस आली. त्यात एक युवती व तिची आई चढली. मात्र, ही बस कोणत्या मार्गे जाणार आहे याचा फलक नव्हता. त्यांनी ते वाहकाला विचारल्यावर ती दुसऱ्याच मार्गे जाणार असल्याचे समजले. त्यांना उतरण्यासाठी वाहकाने बेल वाजवली. या दोघी खाली उतरत असतानाच चालकाने अचानक वेग वाढवल्यामुळे या दोघी खाली फेकल्या गेल्या. ते पाहूनही चालकाने बस थांबण्याचे सौजन्य दाखवले नाही, उलट बस वेगाने चालवून तो निघून गेला.
हा प्रकार पाहून आसपासचे प्रवासी जमा झाले. या दोघींनाही मार लागला होता. विद्यापीठातील एक विद्यार्थी सागर सुरवसे व इतर प्रवासी त्या दोघींना घेऊन  तेथील स्थानक प्रमुखांकडे तक्रार करण्यासाठी गेले. मात्र, काही सांगण्यापूर्वीच प्रमुखाने अरेरावीची भाषा सुरू केली आणि ‘कोणत्या बसमध्ये चढायचे ते तुम्हाला कळत नाही का?’ अशा शब्दांत त्या दोघींची अक्कल काढली. मात्र, नागरिकांचा दबाव वाढल्याने व्यवस्थापकाने नमते घेतले, पण शेवटपर्यंत त्यांनी आपले नाव सांगितले नाही. त्यांच्या खाकी कपडय़ांवर त्यांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. त्यांच्याबरोबर असलेल्या देशमुख नावाच्या अधिकाऱ्याने उलट या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या प्रवाशांचीच नावे व मोबाईल क्रमांक लिहून घेतले. मात्र, प्रत्यक्ष वाहन चालक व वाहकाविरुद्ध तक्रार लिहून घेतली नाही.

बसचा मार्ग समजणार कसा?
अपघातग्रस्त आई व मुलीला मदत करणारा सागर सुरवसे याने सांगितले की, या दोघी घाबरल्या असल्याने त्यांनी स्वत:चे नाव उघड केले नाही. त्यांना डहाणूकर कॉलनीतील शाश्वत रुग्णालयाजवळ जायचे होते. डेपोमधील कक्षात चौकशी केली तेव्हा त्यांनी वारजे-माळवाडी बसमध्ये जायला सांगितले. त्यानुसार त्या दोघी वारजे-माळवाडीच्या बसमध्ये बसल्या. मात्र, ही बस वेगळ्याच मार्गाने जाणार असल्याने वाहकाने सांगितले. त्यामुळे या दोघी खाली उतरत होत्या, त्या उतरायच्या आधीच चालकाने बसचा वेग वाढवला. त्यामुळे या दोघी खाली पडल्या.