समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या संस्था आहेत. मात्र चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी कोणतीच संस्था नाही. एकतर, हे बहुतांश कलाकार आपल्याच कोशात असतात, नाहीतर कामामध्ये बुडून गेलेल्या कलाकारांना इतरांसाठी वेळ नसतो. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कलाकारांनी कलाकारांसाठी काम करावे आणि एकमेकांच्या संपर्कात राहून कलेला वर्धिष्णू करावे, या उद्देशातून ‘आर्ट अँड मी’ हा ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुप सुरू झाला. या ग्रुपमधूनच ‘दि पुणे आर्ट सोसायटी’ ही संस्था स्थापन झाली. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून संस्थेने तीन दिवसांचा ‘पुणे आर्ट फेस्टिव्हल’ नुकताच घेतला.
कोणत्याही देशाची आणि राज्याची श्रीमंती ही बडय़ा इमारती किंवा त्यातील लोकांच्या दरडोई उत्पन्नावर अवलंबून नसते, तर त्या देशातील आणि राज्यातील साहित्यिक आणि कलाकारांवर ही संपन्नता ठरते. वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या लोकांचा मिळून समाज साकारला जातो. समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या संस्था-संघटना कार्यरत आहेत. डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, वकिलांसाठी बार असोसिएशन, नाटय़ कलाकारांसाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मराठी साहित्यासाठी काम करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अशा संस्था आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रांतातील कलाकारांसाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासह विविध महोत्सव होतात. केवळ कीर्तनकारांसाठी श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा कार्यरत आहे. शाहिरी क्षेत्रातील कलाकारांसाठी महाराष्ट्र शाहीर परिषद आहे. मात्र, चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी काम करणारी कोणतीही संस्था नाही. ही उणीव दूर करण्याच्या उद्देशातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांनी ‘आर्ट अँड मी’ हा व्हॉट्स अॅप ग्रुप सुरू केला.
चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार आणि रंगावलीकार अशा विविध कलांमध्ये कार्यरत असलेले अनेक कलाकार आपल्याच कोशात असून त्यातून त्यांना बाहेर काढण्याची आवश्यकता असल्याची जाणीव झाली. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी ‘आर्ट अँड मी’ हा ग्रुप स्थापन झाला. या ग्रुपवर केवळ कलाविषयक भाष्य केले जाते. ‘गुड मॉर्निग’, ‘गुड नाईट’ अशा संदेशांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि राजकारणावर चर्चा करणाऱ्या सभासदास या ग्रुपमधून काढून टाकले जाते. त्यामुळे केवळ कलाविषयक चर्चा हा उद्देश सफल झाला आहे. आतापर्यंत चारशे सभासद झाले असल्याने ‘आर्ट अँड मी’चे दोन ग्रुप करावे लागले आहेत. केवळ चर्चा करून काही साध्य होणार नाही, तर आपल्या कामाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून दिले पाहिजे ही जाणीव झाली. त्यातून ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या धर्तीवर ‘दि पुणे आर्ट सोसायटी’ची नोब्हेंबरमध्ये स्थापना करण्यात आली. या संस्थेला कोणी अध्यक्ष नाही की अन्य कोणी पदाधिकारी नाहीत. सारे चारशे सभासद संस्थेचे स्वयंसेवक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून बालगंधर्व कलादालन येथे तीन दिवसांचा ‘पुणे आर्ट फेस्टिव्हल’ घेण्यात आला. यामध्ये नवोदित कलाकारांना व्यासपीठ तर मिळालेच, पण कलाविषयक अनेक प्रश्नांची सांगोपांग चर्चा करण्यात आली, अशी माहिती डॉ. भारती माटे आणि सुनील हंबीर यांनी दिली.
दि पुणे आर्ट सोसायटीची घटना तयार करून लवकरच संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे. १८ वर्षीय महाविद्यालयीन युवक-युवतींपासून ते पंचाहत्तरी पार केलेले ज्येष्ठ चित्रकार सुधाकर चव्हाण असे संस्थेचे चारशे सभासद आहेत. या संस्थेमध्ये महिला कलाकारांचे प्रमाण ६० टक्के असून पुरुष ४० टक्के आहेत. शिलाचित्रापासून ते समकालीन चित्रकला या विषयी चर्चा व्हावी या उद्देशातून तीन दिवसांचा पुणे आर्ट फेस्टिव्हल घेण्यात आला. युवा कलाकारांना अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे ज्येष्ठ कलाकारांकडून जाणून घेण्याबरोबरच कलाविषयक दृष्टिकोन व्यापक व्हावा, हा या फेस्टिव्हलचा उद्देश सफल झाला आहे. चित्रांची विक्री करताना नेमके किती मूल्य आकारले जावे येथपासून, ते दरमहा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ म्हणून संस्था कार्यरत राहणार आहे. सामान्यांपर्यंत कला कशी पोहोचवता येईल हा आमचा दृष्टिकोन असेल, असे डॉ. भारती माटे यांनी सांगितले.