विषय कागदोपत्रीच?; पुस्तिकांची गरजच नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे
शाळांमधील कला, क्रीडा, कार्यानुभव विषयांच्या शिक्षणाबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या विषयांच्या मार्गदर्शन पुस्तिकांची निर्मिती शिक्षण विभागाने बंद केली आहे आणि या विषयांच्या मार्गदर्शन पुस्तिकांची गरजच नसल्याचे शिक्षण विभागाचे आता म्हणणे आहे. या वर्षी सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे सातवी आणि आठवीच्या पुस्तिका तयार करण्याची प्रक्रियाही बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यासाठी सात दिवस राहिलेले असताना अद्याप हे विषय नेमके कसे शिकवायचे, अतिथी शिक्षक कुठे शोधायचे असे प्रश्न शाळांसमोर उभे आहेत.
शालेय स्तरापासून कला, क्रीडा, कार्यानुभव अशा विषयांची ओळख करून दिली जात होती. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने या विषयांच्या अभ्यासक्रमांचा आराखडा तयार केला. या आराखडय़ानुसार कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोणते घटक शिक्षक शिकवावेत, कोणत्या खेळांची किंवा कलांची ओळख करून द्यावी याचे मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तिका बालभारती तयार करत असे. या वर्षी सहावीचा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, त्याबरोबर शारीरिक शिक्षण विषयाची मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्यात आलेली नाही. सातवी आणि आठवीच्या पुस्तिका तयार करण्याचे कामही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे विषय कागदोपत्रीच अभ्यासक्रमात राहण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने या विषयांसाठी अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण २ हजार शाळांमध्ये मानधनावर अतिथी शिक्षक नेमण्यासाठी मंजुरीही नुकतीच देण्यात आली. मात्र, मार्गदर्शन पुस्तिकाच नसल्यामुळे या शिक्षकांनी कोणत्या वर्गाला नेमके काय शिकवायचे अशा संभ्रमात शाळा पडल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक तासाला अवघे पन्नास रुपये मानधन घेऊन शिकवणारे शिक्षक कुठून आणावेत असाही प्रश्न शाळांना पडला आहे. हे विषय कसे शिकवावेत याचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी सांगितले. मात्र शाळा सुरू होण्यासाठी अवघा आठवडा राहिलेला असताना ही समिती अजून तयारही झालेली नाही.
शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांसाठी पुस्तकांची गरज नाही. म्हणून पुस्तके तयार करण्यात आलेली नाहीत. हे कृतिशील विषय आहेत. आजपर्यंत शिक्षकांनी याचे शिक्षण दिले नाही, नुसतीच पुस्तके वाचली. दोन महिन्यांपूर्वी या विषयाचे शिक्षक आणि तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्येच याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हे विषय कसे शिकवावेत यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. सध्या दोन हजार शाळांमध्ये मानधनावर अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. बाकीच्या शाळांनीही हे विषय शिकवणे बंधनकारक आहे, मात्र त्यांनी हे विषय शिकवण्यासाठी गावातील इच्छुकांना विनंती करून त्यांची नेमणूक करावी.
– नंदकुमार, सचिव शालेय शिक्षण विभाग

Story img Loader