समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात पुरस्कार परत करणे हाच एकमेव योग्य मार्ग नाही. लेखक आणि कलावंतांनी आपल्या कलेतूनच व्यक्त व्हावे, अशी अपेक्षा प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. असहिष्णुतेचे वातावरण पूर्वीपासूनच आहे. पण, त्या त्या वेळी कलाकारांनी आपल्या भावना या कलेद्वारेच समाजासमोर स्पष्टपणाने मांडल्या हे आपल्याला विसरता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मॅजेस्टिक बुक गॅलरीतील दिवाळी अंकाच्या दालनाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संजय भास्कर जोशी आणि रेखा इनामदार-साने यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रकाशक अशोक कोठावळे, निवेदक सुधीर गाडगीळ आणि कथालेखक भारत सासणे या वेळी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, लोकप्रिय शब्दाला आपल्याकडील समीक्षकांनी नकारात्मक अर्थ प्राप्त करून दिला आहे. वास्तवामध्ये लोकप्रियचा अर्थ तसा अभिप्रेत नाही. लोकप्रिय असूनही हे लेखक दर्जेदार साहित्यनिर्मिती करीत असतात. असे लेखक वाचकांना पुस्तकांकडे वळवितात. या प्रक्रियेतून वाचनसंस्कृती वाढण्यास मदतच होते. लोकप्रिय असलेले आणि नसलेले असे प्रकार नसावेत. त्याऐवजी चांगले लेखन आणि वाईट लेखन एवढीच वर्गवारी केली पाहिजे.

Story img Loader