पुणे : ‘ऊसतोड करणाऱ्या मजुराला माणूस म्हणून गिनलं जात नाही. तो अर्धा कोयता अन् नवरा-बायको दोघे काम करणार असतील, तर मिळून ‘फुल’ कोयता होतो. जर एखादे लेकरूही कामात सोबत असेल, तर दीड कोयता होतो. आम्हाला माणूस मानलंच जात नाही, तर माणसाला मिळणारा मानपान कुठनं मिळणार,’ असा सवाल विचारतात पूर्वाश्रमीच्या ऊसतोड मजूर आणि आता महिला किसान मंचाच्या (मकाम) माध्यमातून महिला ऊसतोड मजुरांसाठी काम करणाऱ्या बीड येथील दीपा वाघमारे.
‘मकाम’ आणि ‘सोपेकाम’ या संस्थांतर्फे छायाचित्रे, भित्तिचित्रे, लघुपट, काव्यवाचन, व्याख्यान अशा बहुविध माध्यमांतून शेतकरी महिलांचे जगणे मांडणाऱ्या ‘भविष्य पेरणाऱ्या…’ या कला महोत्सवाचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले होते. त्या वेळी तेथे उपस्थित पूर्वाश्रमीच्या महिला ऊसतोड मजूर ‘मकाम’च्या दीपा वाघमारे यांच्याशी संवाद साधला असता, त्या हे वेदनादायी वास्तव कथन करत होत्या. शेतकरी आत्महत्येची झळ पोहोचलेल्या, पण जिद्दीने पुन्हा उभ्या राहून शेतकरी महिलांसाठी काम करणाऱ्या रेखा वाघमारे यांचीही कहाणी अशी अंगावर काटा आणणारी. या दोघींशी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यांच्या प्रातिनिधिक कहाण्यांतून शेतकरी महिलांचे वास्तव पुढे आले.
‘मुकादमाकडून उचल म्हणून घेतलेले पैसे दोन पिढ्या उसाच्या फडात सडूनही फिटत नाहीत. बापाने घेतलेली उचल फेडायला पोराला कोयता घेऊन फडात जावंच लागतं. जास्त पैसे मिळत्याल, म्हणून बायकोही सोबत जाते. मग मागं राहिलेल्या लेकरांना सांभाळणार कोण, हा प्रश्न पडतो. पोटच्या गोळ्यांना टाकून आईच्या काळजाला जाता येत नाही. तेव्हा टोळीसोबत लेकरांनाही घेऊन जावं लागतं. आई-बापाचं कष्ट बघवत नाही, म्हणून पोरं उसाची मोळी भरायला पुढं येतात. त्यांची शाळा आई-बापाच्या कष्टासमोर अपुरी पडते. शेवटी भूक, मुकादम आणि उचल या चक्रातच ऊसतोड कामगाराच्या पिढ्या कोयता हातात घ्यायला भाग पडतात. स्थलांतर, दारिद्र्य आणि मान मोडून टाकणाऱ्या काबाडकष्टाचा शाप लागलेल्या ऊसतोड कामगारांच्या, त्याहूनही महिलेच्या वाट्याला येणाऱ्या वेदनेवर निदान फुंकर मारता यावी म्हणून आता त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे,’ असे दीपा वाघमारे सांगतात.
हिंगोलीच्या शेतकरी रेखा वाघमारे यांची कहाणी आणखी वेगळी. त्या सांगतात, ‘घरच्या बाप्यानं आत्महत्या केलेली. मग मागं उरलेली दोन चिल्ली-पिल्ली सांभाळण्यासाठी पदर खोचून उभं राहावंच लागतं. नवऱ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर मिळणारी सरकारी मदत पोटात घास जाण्याआधीच सावकार घेऊन गेला. त्याची भूक भागत नाही तोपर्यंत घरातल्या लेकरांना, गोठ्यातल्या जनावरांना हंबरडा फुटतो. शेतीच्या कर्जात नवरा गेलेल्या बाईसमोर शेत, कुटुंब आणि इज्जत सगळ्याच गोष्टी दावणीला लागलेल्या असतात. कलेक्टरच्या ऑफिसात मारलेल्या चकरा, सहानुभूतीसाठी आलेली लहान-मोठी माणसं… सगळी आस संपते, तेव्हा कपाळाचं कुंकू पुसल्यानं डोळ्यांत साठलेल्या आसवांना थांब म्हणून सांगावं लागतं अन् रानातल्या बांधावर खुरपायला जात घाम गाळावाच लागतो. पीक काढावंच लागतं…’
कर्जापोटी शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खचून न जाता, दोन लेकरांना शिकवणाऱ्या रेखा वाघमारे यांना सेवासदन संस्थेने मदत केल्याने त्यांची मुले शिकू शकली. महोत्सवात कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेस आसपास’ या काव्यसंग्रहातील शेती कसणाऱ्या महिलांच्या जगण्यावर बोट ठेवणाऱ्या कवितांचे वाचन, कविता कर्नेरो दिग्दर्शित ‘बीज अंकुरे अंकुरे’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात आले.
छायाचित्रांनी मांडले जगणे!
खोप्यात जगण्याचा पसारा मांडून बसलेली महिला ऊसतोड कामगार, डोक्यावर-खांद्यावर रानातल्या गवताचा, उसाच्या मोळीचा अन् त्याहूनही अधिक संसाराचा भारा वाहून नेणाऱ्या,विळा, खुरपं आणि कोयता हातात घेऊन उन्हाच्या कटाविरूद्ध संघर्ष करणाऱ्या, पावसाच्या हुलकावणीला तोंड देत प्रचंड आशेने भविष्याची पेरणी करणाऱ्या अशा दलित, आदिवासी, विस्थापित, दिव्यांग, एकल महिला शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांचे जगणे छायाचित्रांच्या माध्यमातून या प्रदर्शनात मांडण्यात आले. आहारातून नामशेष झालेल्या राजगिरा, चिवळ, आंबटचुका, आरतफरी, चुचा, करडई, शेंदोळ्या, तांदूळ, कुंदरा, आघाडा, कुंजर, कपाळफोडी, शेवळा, तरोटा, हादगा, करटूले अशा रानभाजांचे महत्त्व या प्रदर्शनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
महिलांनी नेहमीच शेतीला नवे आयाम दिले. मातीतील ओल जाणून घेतली. बीजे पेरली, उगवण केली. मात्र, त्यांच्या डोक्यावर सदा सामाजिक आणि आर्थिक संकटे घोंगावत राहिली. त्यांचे कष्ट बिनमोलाचे आणि बेनामीच राहिले. अशा अनेक पिढ्यांचे भविष्य पेरणाऱ्या महिलांचे जगणे समजून घेणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक शेती कसणाऱ्या, एकट्या, मजूर, मासेमारी, ऊसतोड करणाऱ्या शेतकरी महिलांचे वास्तव आणि त्यांच्या वेदनेची भाषा कळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठीच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सीमा कुलकर्णी महिला किसान अधिकार मंच