पुणे : चॉकलेट आणि कँडीने ओसंडून वाहणारी नदी… माणसापेक्षाही मोठा झालेला पिझ्झा-बर्गर आणि पॉपकॉर्न… मोबाइल-टीव्ही-घड्याळे इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू झाडावर टांगून कामावर गेलेली माणसे… कुणीही उपाशी राहू नये म्हणून सगळीकडे फळे आणि भाज्याच भाज्या… उलटी माणसे-उलट्या इमारती, सगळे काही उलटेच उलटे… वास्तवापासून फारकत घेणाऱ्या स्वप्नातील जादुई दुनियेची ही चित्रे साकारली होती दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या झोपडपट्टीतील लहान मुलांनी.
निमित्त होते नुक्कड कॅफे, भाग्यशाली भविष्य शिक्षा फाउंडेशन यांच्यातर्फे विमाननगर येथील घेणू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालयात झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवाचे. या महोत्सवात मुलांनी काढलेल्या वारली, मंडाला अशा विविध प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन आणि त्यांनी रचलेली गाणी, नृत्ये, पपेट शो इत्यादी कलांचे सादरीकरण करण्यात आले. भाग्यशाली भविष्य शिक्षा फाउंडेशनच्या कजरी मित्रा, नुक्कड कॅफेचे वैभव पालविया आणि कलाकार दीक्षा माने आदी या वेळी उपस्थित होते.
जीना इसी का नाम है…
झोपडपट्टीत राहणारी ही मुले शिकतात आणि त्याचा त्यांना अभिमानही आहे. मात्र, आजूबाजूला कमालीचे दारिद्र्य, मानसिक-सामाजिक संघर्षही चालू आहे. मळलेले, झिंगलेले, उदासवाणे चेहरे असलेले जग नाकारून त्यांना बाहेरचे सुंदर चेहऱ्यांचे, सुंदर वस्त्रातील नीटनेटके चकचकीत जग हवे आहे. कलेच्या माध्यमातून ते हेच सांगू पाहतात. या मुलांना हवे ते रेखाटण्याचे, बोलण्याचे नैसर्गिक स्वातंत्र्य मिळते. उसळत्या वावटळीसारखे त्यांचे विचार रंगांमधून, शब्दांमधून आकार घ्यायला लागतात. जीवन अन् त्याच्या आशा-आकांक्षा, राग, संताप, संघर्ष सगळ्या भावभावना तेथे प्रवाही होतात.
झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांच्या कलेतून समोर येते माणुसकीने भारलेले नवे जीवन. त्यांना अपेक्षा आहे भरपूर अन्नाची, सन्मानाची, त्याहूनही अधिक प्रेमाची. मनात दाटून आलेल्या अशा सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात ही मुले गात होती प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांचे गाणे…
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार,
किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार,
जीना इसी का नाम है…
विरोधाभासातून तयार झालेली सामाजिक-मानसिक परिस्थिती मुलांच्या जडणघडणीवर परिणाम करत असते. मुलांना वर्गात बसवून रोजचे विषय शिकवणे हेच मोठे आव्हान असते. अशा वेळी मुले मोकळेपणाने व्यक्त होत नाहीत. मात्र, कलेच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ शकतात, या उद्देशाने हा कला महोत्सव आयोजित केला जातो.- कजरी मित्रा, संस्थापक, भाग्यशाली भविष्य शिक्षा फाउंडेशन