तब्बल २५ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहाच्या दुरवस्थेची कर्मकहाणी अजूनही सुरूच आहे. भाडेदर निश्चित नसल्याने धूळ खात पडलेले कलादालन व उपाहारगृह यांचे दर निश्चित करण्यास उशिरा का होईना पालिकेला मुहूर्त मिळाला आहे.
स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कलादालन म्हणून बांधलेल्या सभागृहाचे तसेच उपाहारगृहाचे भाडे ठरवण्यास मान्यता देण्यात आली. सभागृहाचे क्षेत्रफळ २९०० चौरस फूट आहे. प्रतिचौरस फूट ५५ रुपयेप्रमाणे एकूण मासिक भाडेदर एक लाख ५९ हजार इतका होणार आहे. उपाहारगृहाचे क्षेत्रफळ १७६.४९ चौरस फूट असून त्यासाठी ६६ रुपये प्रतिचौरस प्रति महा याप्रमाणे एकूण मासिक भाडे ११ हजार ६५० इतके होणार आहे. याशिवाय, पहिल्या मजल्यावरील उपाहारगृहासाठी ५५ रुपये प्रतिचौरस फूट भाडेदर राहणार आहे.
भोसरी, आळंदी, चाकण परिसरातील रसिकांसाठी नाटय़गृहाची निर्मिती करण्यात आली. चार वर्षे रडतखडत काम चाललेल्या नाटय़गृहासाठी २५ कोटींहून अधिक खर्च आला. तरीही आवश्यक त्या सुविधा नाटय़गृहात उपलब्ध नाहीत. दरनिश्चित नसल्याने कलादालन संस्थांना दिले जात नव्हते. तसेच एवढय़ा मोठय़ा नाटय़गृहात चहापाण्याची सोय नसल्याने कलावंत व प्रेक्षकांची भयंकर गैरसोय होत होती. वाहनतळाचा विषय अद्याप अडकून पडला आहे. व्यासपीठाच्या वरच्या बाजूला असलेला लोखंडी बार खाली कोसळण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. सुदैवाने व्यासपीठावर कोणीही नव्हते. अन्यथा मोठा अपघात झाला असता. स्थानिक प्रशासनाकडून तेथील गरजा सातत्याने वरिष्ठांना कळवण्यात येतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्याचाच परिणाम म्हणजे सुविधांअभावी चांगली नाटके व कार्यक्रम तिथे होत नाहीत.