शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुण्यात व्यंगचित्र कलादालनाच्या माध्यमातून साकारले असून, या दालनाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी (२२ एप्रिल) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत.
व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालनाची निर्मिती गरवारे बालभवनजवळ करण्यात आली असून ही जागा दहा हजार चौरस फूट एवढी आहे. त्यातील सात हजार चौरस फुटांवर बांधकाम करण्यात आले आहे. या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता होत असून, या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर अकराशे चौरस फुटांचे कलादालन असून, त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे लावण्यात आली आहेत. याशिवाय एक हजार चौरस फुटांचे आणखी एक कलादालन नवोदित व्यंगचित्रकारांना त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवण्यासाठी बांधण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यावर दृक्श्राव्य माध्यमाची सुविधा उपलब्ध असलेली पंचाहत्तर आसनक्षमतेची गॅलरी बांधण्यात आली असून, उर्वरित एक हजार चौरस फुटांच्या कलादालनात पुणे शहराविषयीचे प्रदर्शन व प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या वास्तूत एकूण चार कलादालने बांधण्यात आली आहेत. या चार कलादालनांमध्ये प्रदर्शने भरवली जातील.
बाजीराव रस्त्याच्या बाजूने या कलादालनाचे प्रवेशद्वार असून, अत्यंत आकर्षक अशा पद्धतीची इमारतीची रचना करण्यात आली आहे. या कलादालनामुळे शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवात भर पडणार असून, नवोदित कलावंतांसाठी चांगले कलादालन उपलब्ध होणार आहे. शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिकेत सर्व राजकीय पक्षांनी, सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे नियोजित वेळेत हे कलादालन उभारणीचे काम पूर्ण होऊ शकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा